सायकल चालवा, पर्यावरण वाचवा या संदेशाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘फिट इंडिया’ चा संदेश घेवून येथील रिंगण फिटनेस फौंडेशनच्या ३५ सायकलपटुंनी इचलकरंजी पंढरपूर हे १६५ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. पंढरपूर येथे झालेल्या सायकल वारीतही त्यांनी सहभाग घेत शारिरीक आणि अध्यात्मिक वारीची अनुभूती घेतली.
रिंगण फिटनेस फौंडेशनच्यावतीने ८ मार्च या महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रियांचा सन्मान आणि गौरव यासाठी इचलकरंजीतील श्री शिवतीर्थ तर श्री क्षेत्र पंढरपूर अशी सायकल वारी सुरू केली. गेल्या चार वर्षांपासून ही वारी सातत्याने सुरू आहे. पंढरपूर येथे गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूर सायकल वारी ही संकल्पना सुरू झाली. या सायकल वारीत गेल्यावर्षी फाऊंडेशनच्या ५ सदस्यांनी सहभाग घेतला होता. पर्यावरणपूरक संदेश देणारी पंढरपूरची सायकल वारी करण्याचा निर्णय यावेळी फाऊंडेशनच्या सदस्यांनी घेतला होता. गजानन महाजन गुरूजी यांच्या हस्ते शिवतीर्थ येथून सायकल वारीची सुरूवात झाली.यावेळी ‘चल भावा सिटीत’ पहिल्या पर्वाचा विजेता ऋषिकेश चव्हाण याची प्रमुख उपस्थिती होती.
इचलकरंजी (Ichalkaranji), जयसिंगपूर,मिरज मार्गे पंढरपूर असा हा १६५ किलोमीटरचा प्रवास होता. ऊन, व पाऊस असा पाठशिवणीच्या खेळाचा अनुभव घेत सायकलपटुंनी ही वारी पूर्ण केली. यामध्ये महिला सायकलपटुंचा मोठा सहभाग होता. या सायकलपटुंना फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन खोंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
