इचलकरंजी महापालिकेत पाण्याची समस्या नित्याचीच…..

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीचा पाणी प्रश्न हा जगजाहीर आहेच. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा आणि वारणा या दोन नद्या प्रमुख मानल्या जातात. मात्र, मागील काही दिवसांपासून पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. याचे मुख्य कारण औद्योगिक वसाहतींमधील रसायनयुक्त सांडपाणी आहे. हातकणंगले तालुक्यातील रूई पुलाजवळ असलेल्या नाल्यातून लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी राजरोसपणे नदीत सोडले जाते.

रूईपासून अवघ्या ७ किमी अंतरावर असलेल्या इचलकरंजी महापालिकेला या नदीचेच पाणी पुरवले जाते. दरम्यान अशीच परिस्थिती इचलकरंजीत आहे. शहरातील मैलायुक्त सांडपाणी काळ्या ओढ्यातून थेट नदीत मिसळणे सुरूच आहे. इचलकरंजीत उद्योजकांनी स्वखर्चातून औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. येथे दररोज सहा ते सात एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केलेले पाणी शेतासाठी दिले जाते.

याशिवाय पंचगंगा नदी काठावर असणाऱ्या गावांमधील छोट्या उद्योगांचे सांडपाणीही नदीत मिसळले जाते. याची प्रशासनाकडे कुठेही नोंद नाही. शिरोळ तालुक्यातील काही दिवसांपूर्वी तेरवाड बंधारा येथे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मासे मेल्याची घटना घडली. आठवडा उलटला तरीही तेरवाड बंधाऱ्यावरील मासे नदी पात्रात तरंगताना दिसतात. नदीच्या काठाला मृत माशांचा खच आहे. कोल्हापूर जिल्ह्याला वरदायीनी ठरलेल्या पंचगंगा नदीत प्रत्येक वर्षी मासे मरण्याचा घटना घडत असतात.

मात्र, यावर काहीही ठोस उपाययोजना किंवा कोणावर कारवाई होताना पहायला मिळत नाही. ‘मासे मरण्याचे प्रकार आता सर्रास घडत आहेत. सांडपाण्यामुळे पाण्याचा रंग बदलला आहे, वास येत आहे. जनावरांना नदीचे पाणी देता येत नाही. शेतजमीन यामुळे क्षारपड होत चालली आहे. उसावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. सांडपाणी नदीत मिसळणे कधी थांबणार, हाच प्रश्न सामान्य लोक विचारत आहेत. शहरवासीयांना पुरेसे शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार अशी भावना लोकांच्या मनात तयार झालेली होती.