वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरांमध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबविले जातात आणि याचा पुरेपूर लाभ नागरिकांना होत असतो.इचलकरंजी महानगरपालिकेकडून नागरिकांना मूलभूत सुविधा दिल्या जातात. सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये वेगवेगळ्या सुविधा आपल्याला घरपोच मिळत असतात. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता धारकांना तसेच नागरिकांना पैशाचा तसेच वेळेचा अपव्यय टाळता यावा यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केलेली आहे. त्यावर मालमत्ता धारकांना पाणीपट्टी, घरफाळा भरता येऊ शकते. तसेच आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, अतिक्रमण आदी विभागाच्या संबंधित ऑनलाईन तक्रार देखील नोंदवू शकतात. यासाठी नागरिकांना आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोमवर जाऊन सुविधा ‘इचलकरंजी एमएनपी’ या वेबसाईटवर जाऊन महानगरपालिकेविषयी माहिती या मेनूवर जाऊन विविध विभागाच्या तक्रारी करू शकतात.
त्यानंतर सदरची तक्रार संबंधित विभागाच्या प्रमुखांच्या पोर्टलवर पाठवली जाते. सदर विभागप्रमुख तक्रार निरसन करण्यासाठी नेमलेल्या विहित कालावधी तक्रारींचे निरसन करून तक्रार केलेल्या नागरिकांना ऑनलाईन कळविले जाते. इचलकरंजी एमएनपी याशिवाय आपले सरकार, सीआरएम, सिटीझन ॲप वरूनही नागरिकांना ऑनलाईन तक्रार करता येते.
महानगरपालिकेने सुरू केलेल्या ऑनलाईन सुविधेचा शहरवासीय मोठ्या प्रमाणात लाभ देखील घेत आहेत. त्यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देखील करण्यात आलेली आहे.
