लाचप्रकरणी अॅड. पाटणकर यांना जामीन मंजूर

कर्जापोटी घरावर होणारी जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यासाठी १ लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी इंडियन बँक कोल्हापूर शाखेतील पॅनेलवरील कायदेशीर सल्लागार अॅड. विजय पाटणकर (वय ३८ रा. इचलकरंजी) यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. पाटणकर यांच्याकडून वकिलामार्फत जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता.

या अर्जावर येथील जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान अॅड. मेहबूब बाणदार यांनी आणि विशेष सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी युक्तीवाद मांडला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने अॅड. पाटणकर यांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर तसेच पंधरा दिवसाला पुणे येथील सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी देण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे.