आम. अशोक माने, आम. राजेंद्र यड्रावकर या महायुतीच्या आमदारांचा शक्तिपीठ आंदोलनाला पाठिंबा……

सध्या सगळीकडे शक्तीपीठ महामार्ग हा मुद्दा खूपच गाजत आहे. याला काही ठिकाणी होकार तर काही ठिकाणी नकार दर्शविला जात आहे. कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्ग बाबत १५ ऑक्टोबर रोजी शासन आदेशाने अधिसूचना रद्द केलेली असताना देखील पुन्हा कोल्हापुरातून महामार्ग रेटायची तयारी सुरू असताना माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, आमदार अशोक माने यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी आंदोलनात देखील सहभागी होण्याचे तसेच मुख्यमंत्र्यांच्या कडे मागणीसाठी पाठपुरावा करण्याचे वचन शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील बाधित गावातील शेतकऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर जाहीर केले.

शक्तिपीठ महामार्ग विरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गुरुवारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार अशोक माने यांनी पाठिंबा दर्शवला. शेतकऱ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आंदोलनात उतरण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. कोल्हापुरातील शक्तिपीठ महामार्गावरून जिल्ह्यात संभ्रमाची स्थिती दिसत आहे. याआधीच प्रकाश आबिटकर व हसन मुश्रीफ या आजी माजी पालकमंत्र्यांनी विरोध नोंदवला आहे. तर , राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी गैरसमज दूर करून प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली आहे.

यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले, शिरोळ सहित कोल्हापुरातील शेत जमिनी या बागायत आहेत व शेतकरी अल्पभूधारक आहेत. पर्यायी महामार्ग असताना महापुराला आमंत्रण देत शेतकऱ्यांची शेती नष्ट करण्याची गरज नाही. आम्ही पूर्वी शेतकऱ्यांसोबत होतो व आज देखील आहे व उद्या देखील राहू.

आमदार अशोक माने म्हणाले, निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना आल्यानंतर मी बाधित गावांना भेटी देऊन आंदोलनाला समर्थन दिले होते. अधिवेशन काळात मुख्यमंत्री महसूल मंत्री व एमएसआरटीसीचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून महामार्ग रद्द होण्यासाठी प्रयत्न करू. सरकारने सकारात्मक पाऊल न घेतल्यास १२ मार्च आंदोलनात सहभागी होऊ.