हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे श्री १००८ भगवान आदिनाथ तीर्थंकर व शिखरस्थ पार्श्वनाथ भगवान मानस्तंभोपरी चतुर्मुख तीर्थंकर आदिनाथ द्वादश वर्षानिमित्त आयोजित पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवात जन्मकल्याणक कार्यक्रम गुरुवार ता. १९ रोजी भक्तीमय वातावरणात पार पडला. पहाटे मंगलवाद्य घोष, सकाळी ७ वाजता नित्यविधी मंगलाष्टक, द्वाविंशती आशीर्वाद, मंगल कुंभ आणणे, पंचामृत अभिषेक शांतीधारा, हवन, पीठयंत्राराधना, गर्भकल्याणक अर्घ्य, यागमंडल पुजन, तिर्थकर बालकाचा जन्म, भक्ती नृत्य, परिक्रमा, नगर प्रवेश, सौधर्म इंद्र, शची यांचा अलौकिक दृश्य आदी कार्यक्रम झाले.
सकाळी ९ वाजता तीर्थंकर बालकाला ऐरावत हत्तीवरून घेऊन सौधर्म इंद्र व शची यांचे पांडुकवनाकडे प्रस्थान झाले. पांडुक शिलेवर ११३ कलशाने तीर्थंकर बालकाचे जन्माभिषेक करण्यात आला. सकाळी १०.१५ वाजता भगवान आदिनाथ विधान झाले. यानंतर त्यागी विद्यानंदीजी महाराज यांचे जन्म कल्याणवर मंगलमय प्रवचन झाले. त्यानंतर सायंकाळचे सवाल पार पडले. ४ वाजता १० जन्मतिशय स्थापना, भक्ती पाठ, शोभा यात्रा तर सायंकाळनंतर सौधर्म इंद्राचे तांडव नृत्य कार्यक्रम पार पडला.
त्यानंतर जन्मोत्सव, नामकरण व पाळणा असे कार्यक्रम झाले. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम, सवाल आणि संगीत आरतीने आजच्या कार्यक्रमाची उत्साहाने सांगता करण्यात आली. आजचे कार्यक्रम राज्याभिषेक सोहळा, यानंतर पीठयंत्राराधना, जन्मकल्याणक अर्घ्य, उपनयन संस्कार व मौंजीबंधन, वास्तुशांती यागमंडल पुजन, राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. दररोज पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवामध्ये पाच हजार श्रावक- श्राविकांचे आहारदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बाहेरगावाहून येणाऱ्या श्रावक-श्राविकांना सकाळी व संध्याकाळी आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
