आमदार जयंत पाटील हे जिल्ह्यातील सर्वांत ज्येष्ठ नेते आहेत. हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्येक आमदार जिल्ह्याचे विविध प्रश्न मांडत आहे. अशातच आता काँग्रेसचे नेते व खासदार विशाल पाटील यांनी सर्वपक्षीय विकास फोरमची संकल्पना मांडली. विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी या संकल्पनेचे स्वागत केले आहे. मात्र, राजकीय हेतूने कोणतेही मुद्दे मांडले जाऊ नयेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. त्यामुळे हा फोरम स्थापन होणार का? झाला तर सर्वपक्षीय नेत्यांचे सूर जुळणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
सांगली जिल्हा सध्या मंत्रिपदापासून वंचित आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप व शिंदेसेनेमध्ये नाराजी आहे. पालकमंत्री कोण होणार, हेसुद्धा निश्चित नाही. जिल्ह्यातील विकासकामांवर या गोष्टींचा परिणाम होणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. प्रत्येक क्षेत्रातील प्रश्न जिल्ह्याला सतावत आहेत. त्यातच अशा कामांवरून सातत्याने राजकीय संघर्ष निर्माण होतो. भविष्यातही तो संघर्ष दिसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच खासदार विशाल पाटील यांनी सर्वपक्षीय फोरमची संकल्पना मांडली आहे.
या संकल्पनेस आता सर्वपक्षीय नेत्यांकडून कसा प्रतिसाद मिळणार, हा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे असा फोरम स्थापन होताना जयंत पाटील त्यांची काय भूमिका राहणार? याकडे लक्ष असणार तसेच आठपैकी किती आमदार फोरमच्या छताखाली येणार, हासुद्धा चर्चेचा विषय आहे.