चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार

राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे नीरा उजवा -कालवा फाटा क्र . ५ ला २२५ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले असून येत्या पाच ते सहा दिवसात फाटा क्रमांक ५ च्या लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यंच्या गावाला पाणी पोहचणार आहे. त्यांनतर चिंचोली (Chincholi) तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार ॲड शहाजीबापू पाटील यांनी दिली.

सध्या नीरा देवघर , भाटघण धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे नीरा -उजवा कालव्यातून फाटा क्र . ५ ला पाणी सोडण्यात यावे व चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा ,अशी मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती . त्यानुसार फाटा क्रमांक ५ ला पाणी सोडून योजनेतील शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडावे तसेच चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्याचे आदेश दिल्याने रविवार ,२७ जुलैपासून फाटा क्र . ५ ला २२५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.