लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपणाला राजकीय समीकरणे बदलतानाचे चित्र दिसून आले. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. आमदारांनी आपला पदभार स्वीकारला. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नव्या वर्षात जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना अपेक्षा होती. पालकमंत्रिपदाचा घोळ संपता संपत नाही.अशी परिस्थिती असताना 26 जानेवारी रोजी पर्यंत पालकमंत्री पदाचे नाव कळेल, असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता.
पालकमंत्री पदासाठी कोणतीच ईर्षा नाही, असे देखील मुश्रीफ म्हणाले आहेत. मात्र जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी हे पद खेचण्यासाठी अंतर्गत स्पर्धा सुरू झाली आहे. अशातच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना या पदासाठी घाईच लागल्याचे नजीकच्या वक्तव्यावरून दिसून आले.मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. मात्र जिल्ह्याचा पालकमंत्री पदावर जिल्ह्याचे तिघे सुपुत्र इच्छुक आहेत. शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तर पुणे कोथरूडचे आमदार आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत.
