आटपाडी वनविभागाची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची ब्रम्हानंद पडळकर यांची मागणी….

सध्या फसवणूक, चोरी, अवैध्य धंदे जोरात सूरु आहेत. या अवैध्य धंद्यांना कुठेतरी भीती निर्माण व्हायला हवी अशी नागरिकांची मागणी देखील असते. अनेक ठिकाणी झाडांची बेकायदेशीर तोड करून विक्री जोरात सुरु असल्याचे चित्र पहायला भेटत आहे. माझ्या समोर नाही, तर माझ्या माघारी कितीही झाडे कापा, असे म्हणणाऱ्या आणि रोपे न लावता, भांगलण न करता, डोंगरातील रोपांना ट्रॅक्टरने पाणी देण्याची किमया करून बोगस बिले काढणाऱ्या, कामावर नियमित हजर नसणाऱ्या वनपाल अस्मिता पाटील आणि वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांच्या कामाची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी पडळकर म्हणाले की, शासकीय आदेशानुसार वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वन हद्दीत राहणे बंधनकारक आहे. पण ते आटपाडीत राहत नाहीत. आणि त्यांच्या कार्यालयात पण उपस्थित नसतात. यापूर्वी वनविभागाने करगणी, खरसुंडी, घरनिंकी, मिटकी परिसरात 2021-22 मध्ये वृक्षारोपण मोहीम राबविली. या रोपांच्या संरक्षण कामासाठी आटपाडीशी संपर्क नसलेले बोगस वनमजूर दाखवण्यात आले आहेत. त्याऐवजी जामखेड, बारामती, सोलापूर जिल्ह्यातील वनमजूर दाखविण्यात आले आहेत. खरसुंडी परिसरात डोंगर आणि दरीत वृक्षारोपण करण्यात आले आहे.

या परिसरात ट्रॅक्टरने पाणी देणे अशक्य आहे. परंतु या डोंगराळ भागात कागदोपत्री टँकरने पाणी देण्याची किमया वनविभागाने करत बिले देखील काढली आहेत. भांगलण पण कागदोपत्रीच दाखवून त्याचीही बिले काढण्यात आली आहेत. त्यामुळे वनविभागाची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.