सध्या प्रत्येक भागात अनेक सोयी सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, कारखाने, उद्योग हे सर्व भागात पहायला मिळतच आहे. इस्लामपूर शहरात तत्कालीन मंत्री आमदार जयंत पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा सुधारला. पण येथे सुविधांचा अभाव आहे. इस्लामपूर शहरालगत पुणे-बंगळुरू महामार्ग आणि सांगली-पेठ रस्ता रुंदीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
शहरात सर्वसोयींयुक्त खासगी रुग्णालयांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्ण पळवापळवीचे प्रकार वाढले आहेत. बहुतांशी रुग्णालयांच्या खासगी रुग्णवाहिका आहेत. तर काही रुग्णवाहिका महामार्गावरील चौकातच अपघात केव्हा होतोय याची वाटच पाहत असतात. त्यातच आता १०८ रुग्णवाहिकेची भर पडली आहे. १०८ रुग्णवाहिकेची १०८ रुग्णवाहिकेची सेवा मोफत असल्याने बहुतांशी रुग्णांचे नातेवाईक या सेवेचा फायदा घेतात.
१०८ रुग्णवाहिकेचे चालक अपघातग्रस्त व इतर रुग्णांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात न आणता खासगी डॉक्टरकडून काटामारी करून त्यांच्या रुग्णालयात दाखल करतात. याठिकाणी नातेवाइकांना भरमसाठ बिलाला सामोरे जावे लागते. या व्यवहारात १०८ रुग्णवाहिका आणि खासगी रुग्णालय यांच्यामध्ये गोलमाल असल्याची चर्चा आहे. याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
