घरफोडीचे सत्र अनेक भागात जोरात सुरु आहे. दिवसाढवळ्या अनेक भागातील घरे फोडली जाऊन मुद्देमाल लंपास केला जात असल्याचे पहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे. अशीच चोरीची घटना हातकणंगले तालुक्यातील रुई येथे उघडकीस आलेली आहे. महादेव मंदिराजवळ राहणाऱ्या आक्काताई पाटील (शिरोळे) यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून घरातील रोख रक्कम आणि दागिने अशी सुमारे ५४ हजारांची चोरी झाली. ही घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली.
पाटील यांच्या पतीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्या दुःख सावरण्यासाठी काही दिवस मुलीकडे गेल्या होत्या. घरी कोणीच नव्हते. पण, गुरुवारी सकाळी त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी उचकटली असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. तिजोरीतील रोख रक्कम दोन हजार, सोन्याचे गंठण, सोन्याचे मणी, चांदीची जोडवी, चांदीचा गणपती असे एकूण सुमारे ५४ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. चोरीची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे.