आष्टा दुय्यम निबंधक कार्यालयात मनमानी कारभार; स्टॅम्प विक्रेत्यांकडून नागरिकांची लूट

आष्टा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात स्टॅम्प विक्रेत्यांचा मनमानी कारभार सुरू होता. स्टॅम्प विक्रीसाठी वार पद्धत सुरू होती. आठवड्यातील प्रत्येक दिवसाला एकच स्टॅम्प विक्रेता ठरवण्यात आला होता. त्याच्या मर्जीनुसार विक्री यामुळे नागरिकांचे हाल होत होते. स्टॅम्प विक्री सह अन्य प्रश्नांवर आज अॅड. अभिजीत वग्याणी यांनी आवाज उठवला. अभिजीत वग्याणी यांनी नागरिकांना सोबत घेत, स्टॅम्प विक्रेत्यांसह दुय्यम निबंधक गुरव यांना चांगलेच धारेवर धरले. स्टॅम्प विक्रेता यांच्याकडील आकडेवारी घेतली असता ती एक हजाराहून अधिक निघाली.

उपस्थितांनी कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. निबंधक श्री. गुरव यांनी सर्व स्टॅम्प विक्रेत्यांना एकत्र बोलावून स्टॅम्प विक्रीची वार पद्धत बंद करून सर्वांनी कार्यालयीन वेळेत नियमितपणे स्टॅम्प विक्री करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गुंडाभाऊ आवटी, कै. बापूसो शिंदे सेवाभावी संस्थेचे अशोक मदने उपस्थित होते. यावेळी अॅड. अभिजीत वग्याणी यांनी अधिकारी व स्टॅम्प विक्रेत्यांचा कारभार न सुधारल्यास तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाकडून सर्वसामान्य माणसाला चांगली वागणूक न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला.