अनेक भागात अनधिकृत डिजिटल फलके लावण्यात येतात पण याला अनेकांकडून विरोध देखील दर्शविला जातो. सध्या आष्टा शहरात असेच भाजपाचे अनधिकृत फलक काढण्याची मागणी युवक राष्ट्रवादीने मुख्याधिकाऱ्यांकडे केलेली आहे. आष्टा शहरात नगर पालिकेच्यावतीने झालेल्या कामांचे डिजिटल फलक लावून भारतीय जनता पार्टी श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. हे सर्व फलक अनधिकृत आहेत. नगरपालिका व प्रशासनाने हे फलक तात्काळ काढून घ्यावेत, अन्यथा प्रशासक विरोधात तीव्र आंदोलन करु असा इशारा आष्टा शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे शहराध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला. यावेळी युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
याबाबत योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन आष्टा पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. शिवाजीराव चोरमुले म्हणाले, आष्टा नगरपरिषदेच्या खुल्या जागेत बहुउद्देशिय सभाग्रह बांधणे व सुशोभिकरण करण्यासाठी ४६ लाख ६० हजार रुपये, तसेच बगीच्या विकास कामाचा शुभारंभ ३२ लाख ६४ हजार रुपये यासह विविध ठिकाणी नगरपरिषदेच्या जागेतील विकास कामांचा शुभारंभ भाजपचे तालुका अध्यक्ष यांनी बोर्ड लावून केला आहे. प्रशासक काळात निधी कोणी दिला, कधी आणि किती दिला, त्या कामाचा शुभारंभ कुठल्यातरी पक्षाच्या पदाधिकारी यांना घेता येतो का ? त्याची टेंडर प्रक्रिया झाली आहे का ? झाली असेल
तर त्या कामाचा व ठेकेदाराच्या नावाचा बोर्ड लावणे आवशक आहे.
परंतू भाजपच्या तालूका अध्यक्षांचा फोटो लावून बोर्ड उभा करण्यात आला आहे. या बोर्डाला नगरपालिकेची परवानगी घेतली आहे का ? नसेल तर बेकायदेशीर बोर्ड काढण्यात यावेत व संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा आष्टा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.
