आम. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नाला यश!

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत पाण्याची तीव्र टंचाई तर जाणवतेच पण प्रदूषणाचा प्रश्न देखील खूपच आहे. पंचगंगा नदीत प्रदूषण खूपच मोठ्या प्रमाणात होऊन गाळ साचलेला आहे. या पार्श्वभूमीवर आम. डॉ. राहुल आवाडे यांच्या मागणीवरून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली काल शुक्रवारी बैठक झाली. इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पात्रातील मोठ्या प्रमाणात साठलेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांमार्फत काढून घेऊन जाणेसाठी मान्यता देण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या निर्णयामुळे पंचगंगा नदी मोकळा श्वास घेईलच शिवाय महापूर नियंत्रणासाठी या निर्णयामुळे मोठा हातभार लागणार असल्याचे आम. डॉ. राहुल आवाडे यांनी सांगितले. पंचगंगा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नदीचे पात्र उथळ झालेले आहे, आणि त्यामुळे पावसाळा कालावधीमध्ये नदीपात्र दभडी भरुन वाहते. इचलकरंजी शहरामध्ये पूरस्थिती निर्माण होते. सन २००५, २००६, २०१९, २०२१ या वर्षामध्ये पंचगंगा नदीत पूर आल्यामुळे शहरामध्ये पूरस्थिती निर्माण होऊन लोक बाधीत झाले होते. पावसाळ्यापूर्वी नदीपात्रात साठलेला गाळ काढण्याचे काम हाती घेतले तर नदी पात्रातील खोली वाढणार आहे.

परिणामी पूरस्थिती नियंत्रणात येणार आहे. नदीमध्ये पाणी सामावून घेण्याची क्षमता वाढणार आहे. यास्तव हा प्रकल्प त्वरीत राबवणे आवश्यक असल्याचे सदस्यांनी नमूद केले. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, आयुक्त ओमप्रकाश दिवटे, कार्यकारी अभियंता हर्षजीत घाटगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे, सुशांत रेवडेकर, श्रीमती सरिता थोरात, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, उपकार्यकारी अभियंता संदिप दावणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदींसह इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.