चांदी कारागीरांना मिळणार तीन वर्षाचा मोफत आरोग्य विमा

हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे चांदी व्यवसाय खूपच प्रसिद्ध आहे. येथे चांदी व्यावसायिक वर्ग मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो. केंद्र सरकारने खास सोने, चांदी व हिरे उद्योगातील कारागीर व उद्योजकासाठी विमा योजना आखली असून या योजनेतून १८ ते ७० वर्षांपर्यंतच्या कारागीरांना याचा लाभ घेता येतो. या विम्यात सर्व आजार समाविष्ट केले असून कोणतीही वैद्यकीय चाचणी न करता मोफत विमा दिला जातो. सुरूवातीला एक वर्षाकरीता विमा दिला जात होता. तो आता तीन वर्षाकरिता दिला जाणार आहे. या विम्याचा आतापर्यंत हुपरी चांदी फाऊंडेशनने विविध आजाराने दवाखान्यात उपचार झालेल्या ५८ कारागीरांना लाभ मिळवून दिला आहे.

हुपरी येथील सोने, चांदी व हिरे उद्योगाशी निगडीत कारागीर व उद्योजकांना डिजिटल ओळखपत्र देणे चालू असून ओळखपत्र घेणाऱ्या कारागीर, उद्योजकांचा तीन  वर्षाचा प्रत्येकी ३५ हजार खर्चाचा मोफत आरोग्य विमा उतरवला जाणार आहे. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल या केंद्र सरकार पुरस्कृत संस्थेच्यावतीने चांदी उद्योगाशी निगडित असलेल्या लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहन खोत यांनी केले आहे.

याशिवाय जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या वतीने दिले जाणारे डिजिटल ओळखपत्र वैशिष्ट्यपूर्ण असून एखादा कारागीर, उद्योजक सोने, चांदी किंवा मौल्यवान दागिणे घेऊन जात असतांना एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने अडवले असता संबंधित अधिकाऱ्याने मोबाईल वरून ओळखपत्रा वरील युनिक नंबर मेसेज केल्यास टू वे मेसेजद्वारे ओळख पटविण्याची सोय केली आहे.