कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक एकावर गुन्हा

फसवणुकीच्या जाळ्यात अनेकजण हे दबावले गेलेले आहेतच. अनेक आमिषांना बळी पडून आर्थिक फसवणूक सध्या होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कर्ज मिळवून देतो असे सांगून वेगवेगळ्या कारणासाठी सुमारे २४ लाख ४० हजार ९९० रुपये घेऊन, त्यामधील सुमारे १४ लाख १२ हजार ९१० रुपये अद्यापपर्यंत परत दिले नाहीत व कर्जही दिले नाही म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी सांगोला पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राहुल जगताप याला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली नव्हती. याप्रकरणी चंद्रकांत गायकवाड (रा. कडलास ता. सांगोला यांनी राहुल बबन जगताप (रा. अकलुज ता. माळशिरस) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सन २०२१ ते २२ एप्रिल २०२३ रोजीच्या दरम्यान, राहुल जगताप यांनी फिर्यादी गायकवाड व इतर साक्षीदार अक्षय लवटे (रा. कडलास ता. सांगोला) यांना विश्वासात घेऊन, त्यांना बालाजी फायनान्समधून १२ टक्के व्याजदराने कर्ज करुन देतो, असे म्हणून वेगवेगळ्या कारणासाठी फिर्यादी यांच्याकडून २४ लाख ४० हजार ९१० रुपये घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज दिले नाही. फिर्यादी व इतर साक्षीदार यांनी पैसे परत मागितले असता, राहुल जगताप यांनी फिर्यादी व इतर साक्षीदार यांना सुमारे १४ लाख १२ हजार ११० रुपये अद्यापपर्यंत परत दिले नाहीत, वारंवार पैसे मागितले असता, त्यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ करून फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.