लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे.त्यामुळेच महाविकास आघाडीचे पुढील धोक्यात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. परंतु दुसऱ्या बाजूला राज्यातील प्रमूख पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
राज्यात सध्या 29 महापालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्त आहेत. यात प्रशासकीय कालावधी 2 वर्षांहून अधिक काळ लांबल्याने स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, राज्य सरकारने निवडणुका वेळेत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांची ग्वाही दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणाची अंतिम सुनावणी 22 जानेवारीला होणार आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकांतील यशामुळे महायुतीतील पक्षांचा आत्मविश्वास आणखीन वाढला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही विजय मिळवण्यासाठी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. या सर्व घडामोडींमध्ये निवडणुका येत्या एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अजूनही कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
त्यापूर्वीच राजकीय वर्तुळात स्थानिक निवडणुकांचे महत्त्व लक्षात घेत पक्षांनी आपापल्या पातळीवर रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.