खानापूर आटपाडी विटा तालुक्यातील विकासासाठी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी जीवाचे रान केले. अनेक समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिले. तसेच अनेक विकासकामे करण्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी कायम प्रयत्नात राहिले. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून वीज उपकेंद्र सुरु करण्याची मागणी होती. आमदार अनिलभाऊ यांनी हे वीज उपकेंद्र मंजूर करुन आणले. या परिसरातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी विज पुरवठा व्हावा, हे स्वप्न अनिलभाऊंनी पाहिले होते.
स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटचालीनुसार विकासकामे सुरू आहेत. खानापूर तालुक्यातील वाझर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अतंर्गत ३३ / ११ केव्ही वीज उपकेंद्राचा उदघाटन सोहळा आमदार सुहासभैय्या बाबर यांच्या हस्ते संपन्न झाला. वाझर बीज उपकेंद्रामुळे वाझरसह तांदळगाव, बलवडी (भा) या गावांतील शेतीच्या वीज पंपांना वीज पुरवठा होईल. वारंवार खंडीत होणाऱ्या वीजेचा प्रश्न निकाली निघणार आहे.
वाझर उपकेंद्रामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल, अशी ग्वाही आमदार सुहास बाबर यांनी दिली. अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी जाधव होत्या. यावेळी कार्यकारी अभियंता विनायक इदाते, उपकार्यकारी अभियंता धनंजय गावडे, उपसरपंच विनायक जाधव उपस्थित होते. आमदार बाबर म्हणाले, की आरफळ ताकारी योजनेचे पाणी शिवारात फिरल्यामुळे विजेची मागणी प्रचंड होती.पाणी होते पण वीज पुरवठा पुरेशा दाबाने होतं नव्हता. याचा विचार करून स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी हा प्रश्न मार्गी लावला.
त्या स्वप्नाची आज पुर्तता होत आहे. खंडीत होणाऱ्या वीजेचा प्रश्न संपुष्टात आला आहे. भविष्यात तालुक्यात अनेक उपकेंद्रे वाढविण्याचा मानस आहे. स्वागत व प्रास्ताविक उपसरपंच विनायक जाधव यांनी केले.