बनपुरी येथे बस थांबे, प्रसाधनगृहाची सोय करण्याची मागणी….

आटपाडी तालुक्याच्या राजकारणामध्ये वेगळे अस्तित्व निर्माण करत आमदार, जि. प. अध्यक्ष, तालुका पंचायत समितीचे चार सभापती दिलेल्या बनपुरी गावच्या चार दिशांना जाणाऱ्या चौकात निवारा बस थांब्याची शेकडो प्रवाशांना नितांत गरज असून शासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केली आहे.

सुमारे ७ हजार लोकसंख्या असलेल्या बनपुरी, शेंडगेवाडी व परिसरातल्या शालेय महाविद्यालयीन मुले, मुली मोठ्या संख्येने आटपाडी, तडवळे, करगणी, खरसुंडी या चार दिशांच्या प्रशाला-महाविद्यालयांकडे प्रतिदिनी जा-ये करतात. यांच्यासह ग्रामस्थांचीही याच दिशांच्या गावांकडे नेहमीच जा-ये असते. वयोवृद्ध, आजारी व्यक्ती, चाकर, मजूर शेतकरी, महिला यांना बनपुरी चौकात वाहनांची प्रतीक्षा करताना उन, वादळ, वारा, पाऊस यांचा तासन् तास सामना करावा लागतो.


बनपुरीच्या मुख्य चौकातून आटपाडी, तडवळे, करगणी, खरसुंडीकडे जाणारे मोठ्या वर्दळीचे मुख्य रस्ते आहेत. या चौकात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सतत वर्दळ – रेलचेल असते. या चारही रस्त्याला खेटूनच मोठ्या संख्येने व्यावसायिकांची दुकाने असल्याने विविध गावांना जाणाऱ्या चारही दिशांच्या रस्त्यावर शालेय मुली, विद्यार्थिनी, युवती, महिला, रुग्ण यांची मोठी कुचंबणा होत असते. यासाठी निवारा बस थांब्याची नितांत गरज आहे. याचबरोबर चौकातच महिला व पुरुष यांच्यासाठी सुलभ प्रसाधनगृह गरजेचे आहे.