सध्या भागाभागात रस्ते कामांचा शुभारंभ सुरु आहे. अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झाल्याने वाहनधारकांमधून समाधानाचे वातावरण होते. वाहतुकीस खूपच अडथळे निर्माण होत होते. हातकणंगले तालुक्यातील देखील अनेक भागातील रस्ते नादुरुस्त अवस्थेत होते. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे सांगवडे ते जंगमवाडी पर्यंतच्या कोट्यावधी रुपयाच्या रस्त्याचे काम सुरू होते. कोल्हापूरहून पट्टणकडोली माळी पेट्रोल पंपापर्यंत आणि हुपरीहुन पट्टणकोडोली खराडे यांच्या घरापर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
पट्टणकोडोलीत मध्यभागी असणाऱ्या रहदारीच्या ठिकाणी जवळपास ७०० मीटरचा रस्ता गेली दोन वर्षे झाले अर्धवट अवस्थेतच आहे. रस्त्यामध्ये प्रचंड प्रमाणात खड्डे पडून ग्रामस्थ, विद्यार्थी आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. याबाबत आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार हडबडून जागे झाले. शनिवारी रस्त्याच्या मध्यभागी गटारीसाठी सिमेंट पाईप टाकून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी प्रभारी सरपंच अमोल बाणदार, माजी उपसरपंच अंबर बनगे, ग्रामपंचायत सदस्य नाना मोठे, रामचंद्र जाधव आदींसह ग्रामपंचायत प्रशासन उपस्थित होते.
