राजेवाडीतला म्हसवड तलाव आटपाडीचाच व्हावा सादिक खाटीक यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना मागणी….

खानापूर आटपाडी सांगोला हा भाग जास्तीत जास्त दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात पाण्याची तीव्र टंचाई देखील जाणवते. अलीकडच्या काळात सरकार तर्फे अनेक उपाययोजना देखील आमलात आणल्या जात आहेत.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी शहराच्या वायव्य दिशेला ३० किमी अंतरावर राजेवाडी गावालगत ३ टीएमसी इतक्या क्षमतेचा भला मोठा तलाव आहे.

१९६३ च्या दरम्यान राजेवाडी तलावाच्या सांडव्याची उंची एक फुटाने वाढविल्याने या तलावाची थोडी फार पाणी क्षमता वाढली आहे.तरीही गाळाने राजेवाडीचे पाणी जवळपास निम्मानेच कमी झाले आहे. १८८० ते १९३२ पर्यत म्हणजे जवळ जवळ ५२ वर्षे राजेवाडीतल्या या म्हसवड तलावाने पंढरपूर शहराला पिण्याचे पाणी पुरविले आहे.

पंढरपूरच्या पदमावती तलावात जाणारे राजेवाडीचे हे पाणी गोपाळपूर पर्यंत जात होते. भाटघर धरणाचे पाणी पंढरपुरात आल्यानंतर राजेवाडीचे पंढरपूरकडे जाणारे पाणी बंद करण्यात आले. त्याच न्यायाने, सांगोला तालुक्याला विविध पाणी योजनातून पाणी मिळू लागले आहे.आणखी काहीं योजनांचे पाणी भविष्यात त्यांना मिळणार आहे. त्या पार्श्वभूमी वर राजेवाडीतल्या या म्हसवड तलावाचे बहुतांश पाणी आता आटपाडी तालुक्यातच सर्वत्र फिरविणे न्यायाचे होणार आहे.

 राजेवाडी गावा लगतच्या या मोठ्या तलावाचे नाव शासन दरबारी आजही म्हसवड तलाव असेच आहे. वास्तवीक म्हसवड हे राजेवाडी गावापासून २० किमी इतके लांब, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातले गाव आहे. मात्र आटपाडी तालुक्यातील राजेवाडी गावा लगतच्या या तलावाचे नाव म्हसवड तलाव आहे, ते तात्काळ बदलून राजेवाडी तलाव असे शासन दप्तरी नामकरण झाले पाहिजे.

तसेच या तलावाचे शासकीय व्यवस्थापन आटपाडी शहरापासून १०० किमी वरील सातारा जिल्ह्यातील फलटण येथे आहे . कार्यकारी अभियंता निरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्या माध्यमातून यावर व्यवस्थापन केले जात आहे. या म्हसवड (राजेवाडी) तलावाचा उपविभाग सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आहे, तर शाखा कार्यालय सोलापूर जिल्ह्याच्याच सांगोला तालुक्यातील महुद येथे आहे. फलटण येथील म्हसवड तलावाचे व्यवस्थापन तातडीने बदलून याचे शासकीय व्यवस्थापन सांगली पाटबंधारे मंडळ यांच्याकडे वर्ग केले जावे. या तलावाच्या उपविभागाचा कारभार आटपाडीतून सुरु केला जावा आणि शाखा कार्यालय राजेवाडी येथे सुरू केले गेले पाहिजे.

आटपाडी तालुक्यातील या तलावाचे बहुतांश पाणी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अनेक गावांना जाते आहे. आटपाडी तालुक्यातील थोड्याच क्षेत्राला याचा उपयोग होत आहे. मात्र सांगोला तालुक्यात अनेक योजनांचे पाणी आले आहे. हे लक्षात घेऊन राजेवाडी तलावाचे बहुतांश पाणी आटपाडी तालुक्यालाच दिले गेले पाहीजे. आटपाडी शहराच्या, तालुक्याच्या पश्चिमेला, नैरुत्य ते वायव्य या दरम्यानच्या दिशेला अनेक तलावांची (१० पेक्षा जास्त ) शृंखला आहे. राजेवाडी तलावाच्या नव्या कॅनॉलच्या माध्यमातून राजेवाडी तलावाचे बहुंताश पाणी आटपाडी तालुक्यातील सर्व तलावांना कॅनालने जोडत तलाव जोड योजनेतून सर्व तालुकाभर फिरवत नंतर ते पाणी सांगोला तालुक्यातल्या बुद्धीहाळ तलावाकडे नेले पाहिजे.

राजेवाडी तलावातला गाळ काढून आटपाडी तालुक्यातील शासकीय अथवा खाजगी पडीक, मुरमाड जमिनीवर ओतला पाहीजे. राजेवाडीचे पाणी आटपाडी तालुक्यातल्या इतर तलावांमध्ये सायपनने जावू शकते. नीरा धरणाच्या नीरा कालव्यातून राजेवाडी तलाव बारमाही प्रवाहीत ठेवण्यासाठी नीरेचे पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे. याशिवाय गतवर्षी उरमोडीचे पाणी राजेवाडीत आणले गेले होते. हा राजेवाडी तलाव सतत प्रवाही रहावा यासाठी शासनाने उरमोडी अथवा नीरेच्या पाण्यातून राजेवाडी तलावासाठी खास तरतुद केली पाहीजे.

या सर्व बाबी  लक्षात घेऊन आटपाडी तालुक्याच्या राजेवाडीतल्या म्हसवड तलावाच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यावर शतकापासून होत असलेल्या अन्यायावर राज्याच्या शासनाच्या माध्यमातून न्याय द्यावा. अशी मागणी शासनकर्त्यांकडे करून सादिक खाटीक यांनी अन्य लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री महोदयांना खास पत्र लिहून केली आहे. आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडीतला म्हसवड तलाव १४० वर्षानंतर तरी आटपाडीचाच केला जावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केली आहे.