इचलकरंजी शहरात अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील पहायला मिळतो. अनेक सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. इचलकरंजीत उद्या २६ जानेवारीपासून १० फेब्रुवारी पर्यंत संगीत नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित केलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी इचलकरंजी येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे २६ जानेवारी २०२५ पासून सुरु होत आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
उद्या २६ जानेवारी ते ता. १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे संपन्न होणाऱ्या स्पर्धेत एकूण १६ संगीत नाटकांचे सादरीकरण होणार आहे. दररोज सायंकाळी ७.०० वा प्रयोग सादर होणार आहेत. संगीत नाटकांचे प्रयोग पाहण्यासाठी नाममात्र रु १५ व रु.१० इतक्या कमी रक्कमेची तिकिटे ठेवण्यात आलेली आहेत. संगीत नाटक पाहण्यासाठी तसेच त्यांना दाद देण्यासाठी जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.