नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताचा महिला संघ विश्वविजेता ठरला. या विश्वविजेत्या संघातील खेळाडू हातकणंगले तालुक्यातील चंदुरची सुकन्या वैष्णवी बजरंग पोवार हिचे गावात जल्लोषी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करत उघड्या जीपमधून वैष्णवी हिची मिरवणूक काढण्यात आली. तिच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. चंदुरसारख्या खेडे गावातील वैष्णवीने आपल्या जिद्दीच्या बळावर खो-खो खेळात आपले कौशल्य दाखवत स्थानिक पातळीपासून देश व जागतिक पातळीवर ठसा उमटवला. विश्वचषक विजयानंतर ती शनिवारी गावात परतली. ग्रामस्थ व मित्रपरिवाराने तिच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती.
या स्वागत मिरवणुकीमध्ये वैष्णवीसोबत आई माधुरी, वडील बजरंग, प्रशिक्षक तात्यासाहेब कुंभोजे होते. चंदुर गावच्या वेशीवरून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच योगिता हळदे, पं.स. माजी सभापती महेश पाटील यांच्यासह सदस्यांनी तिचे स्वागत केले. साऊथ आफ्रिकासोबत झालेल्या उपांत्य सामन्यात वैष्णवी सामनावीर ठरली. तसेच भारतीय संघात पळतीमध्ये पहिल्या तीनमध्ये तिचा समावेश होता. इचलकरंजीतील राजमाता जिजाऊ संघात ती ७ वर्षे सराव करत होती. कोल्हापूर खो-खो असोसिएशनमार्फत तिची भारतीय संघात निवड झाली. तेथून ती विश्वचषक जिंकूनच परतली.