इस्लामपूर- कापूसखेड रस्त्यावर म्हसोबा मंदिरानजीक दुचाकीने धडक दिल्याने जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उमेश महादेव माटेकर (वय ४२, मूळ रा. तुपेवाडी काढणे, ता. पाटण, जि. सातारा, सध्या रा. कापूसखेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार अजय संपत माने (रा. कापूसखेड) या संशयिताविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा अपघात नऊ दिवसांपूर्वी घडला होता. जखमी उमेश यांच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, १६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उमेश हे इस्लामपूर- कापूसखेड रस्त्याने चालत निघाले होते. तेथील म्हसोबा मंदिरानजीक समोरून आलेल्या अजय याच्या दुचाकीने (एमएच १० डीएक्स ०२३३) उमेश यांना जोराची धडक दिली. धडकेत उमेश हे रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उमेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री सुनीता तुपे यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली.
