सांगोला शहर आणि तालुक्याच्या विकासाला चालना देणाऱ्या कामांना गती देऊन भरघोस निधी मिळवून द्यावा, सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात याव्यात, तालुक्याला मिळणारे हक्काचे पाणी वेळेत आणि पूर्ण क्षमतेने देण्यात यावे या आणि इतर मागण्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या राजश्रीताई नागणे पाटील नवनाथभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यातील भाजपा शिष्टमंडळाकडून करण्यात आल्या. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, सांगोला तालुक्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. विकास कामांसाठी भरीव निधी दिला जाईल अशी ग्वाही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर प्रथमच श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी ते पंढरपुरात आल्यानंतर त्यांचे स्वागत आणि सत्कार सांगोला तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला. यावेळी मा. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या राजश्रीताई नागणे पाटील, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते शिवाजी अण्णा गायकवाड, युवा नेते डॉ. परेश खंडागळे आदी उपस्थित होते.
मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या गावातील ग्रामपंचायतींना विशेष निधी देऊन सांगोला तालुक्यातील छोटे मोठे गावे विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न व्हावा. शहर व तालुक्याच्या विकासाला अजून गती मिळावी. पाण्याच्या योजना शेवटच्या लाभार्थी व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. यासह सांगोला तालुक्याचां दौरा आयोजित करावा असेही भाजपा शिष्टमंडळाकडून मागणी करण्यात आली. या मागणीला पालकमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
