शासनाकडून अनेक नवनवीन योजना राबविल्या जातात. जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा पुरेपूर फायदा होईल. सध्या शक्तीपीठ महामार्ग हा मुद्दा खूपच जोर धरू लागला आहे. याला अनेकांचा विरोध आहे तर काहींचा पाठींबा. शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरनंतर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करण्यास सुरूवात केली आहे. सांगली जिल्ह्याच्या १५ गावांतून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात १२ ग्रामपंचायतींनी थेट ग्रामसभा घेत महामार्ग रद्दचा ठराव केला आहे.
शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथून प्रवेश करणार आहे. खानापूर तालुक्यातील बाणूरगड, कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी, तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकी, मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव, बिसूर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी या गावांतून महामार्ग जाणार आहे.
या गावांपैकी शेटफळे, तिसंगी, बाणूरगड या गावांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत कोणताही ठराव केला नाही. पण, उर्वरित १२ गावांनी आमच्या गावातील शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तिपीठ महामार्ग नको, अशा मागणीचा ठराव केला आहे.शक्तिपीठ महामार्गामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत. तो रद्द करण्यात यावा, अशा मागणीचा ठराव करण्यात आला.
मागणी नसताना ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग करण्याचा शासनाने प्रयत्न करू नये. अशीही ग्रामसभेत मागणी केली. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ होऊ देणार नाही. अशी आक्रमक भूमिका सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली.