इचलकरंजी शहरात अनेक नवनवीन मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देखील प्राप्त होतो. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धा २०२४-२५ अंतिम फेरीचा उदघाटन समारंभ येथे उत्साहात संपन्न झाला. इचलकरंजी येथील महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक ओमप्रकाश दिवटे, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईचे प्रतिनिधी गणेश अडसूळ आणि नाट्य परिषद इचलकरंजी शाखेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. मर्दा यांच्या हस्ते नटराज प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना यावेळी दिवटे यांनी आजच्या धावपळीच्या जगात समृद्धपणे जीवन जगण्यासाठी संगीत व नाट्यकला या आवश्यक गोष्टी आहेत. यामध्ये संगीत नाटक ही अधिक कौशल्याची गोष्ट आहे कारण यामध्ये अभिनय, सादरीकरण, संवाद आणि उच्चार याबरोबरच सूर आणि तालाचे भान ठेवावे लागते अशा प्रकारचे उदगार काढले.
त्यापूर्वी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना मर्दा यांनी जगण्यासाठी केवळ पैसे मिळविणे ही गोष्ट महत्त्वाची नाही तर एखादी तरी कला येणे, कलेची आवड असणे महत्त्वाचे आहे. तसे असेल तर आपण अधिक चांगल्या प्रकारे जगण्याची वाटचाल करू शकतो अशा आशयाचे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर सौ. मंगला आपटे पुणे, दीपक कलढोणे सोलापूर, राजेंद्र फडते गोवा, संजय जोशी नांदेड आणि वसंत दातार, पुणे हे महाराष्ट्राच्या विविध भागातील अनुभवी रंगकर्मी परीक्षक म्हणून उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली.
यावेळी गणेश अडसूळ यांच्या हस्ते सर्व परीक्षकांना पुस्तक भेट देण्यात आले तर स्पर्धेचे समन्वयक श्रीनिवास फाटक यांच्या हस्ते पाहुण्यांना गुलाबपुष्प प्रदान करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित ढवळे यांनी केले तर शेवटी नाट्य परिषद शाखेचे प्रमुख कार्यवाह संजय होगाडे यांनी आभार व्यक्त केले. स्पर्धेचे सहसमन्वयक या नात्याने सचिन चौधरी, कपिल पिसे आणि संतोष आबाळे हे काम पाहात आहेत.
येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सदरची स्पर्धा सुरू झाली असून १० फेब्रुवारीपर्यंत दररोज सायंकाळी ७ वाजता नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. महाराष्ट्र आणि गोवा येथील नामवंत संघांची नाटके स्पर्धेत सादर होणार आहेत.
