हुपरी रोडवर अभिषेक स्पिनींग मिल्समध्ये तणाव, आवाडे समर्थकांची गर्दी

अलीकडच्या काळात फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे सध्या चित्र दिसत आहे. यामध्ये अनेक सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक देखील होत आहे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनींग मिल्समध्ये मंगळवारी दुपारी माजी आमदार प्रकाश आवाडे कुलूप तोडून घुसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनग मिल्समध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत मागण्यासाठी मंगळवारी माजी आमदार प्रकाश आवाडे हे कुलूप तोडून आत घुसले.

कर्मचारी कुलुप काढत नाहीत म्हटल्यावर कुलूप तोडा मला कोण काय करते बघूयाच असे ते म्हणत असतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. यासंदर्भात गोकुळ शिरगांव पोलिसांत रात्री उशिरापर्यंत कोणतेही नोंद झाली नव्हती. परंतू घडलेला प्रकार पोलिस अधीक्षकांना कळवण्यात आल्याचे व ११२ क्रमांकावर माहिती दिल्याचे मिल्सच्यावतीने सांगण्यात आले.

मिल्सकडून दिलेली माहिती अशी, या मिल्सचे भागीदार अण्णासाहेब मोहिते यांना २०१९ च्या आधी मिल्ससाठी आर्थिक गरज होती. म्हणून तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्या बँकेतून कर्ज द्यावे अशी मागणी केली. परंतू आवाडे यांनी तसे न करता स्वत:जवळील ४ ते ५ कोटी रुपये या प्रकल्पामध्ये गुंतवले व प्रकल्पाचे भागीदार झाले.

दरम्यान प्रकल्पासंबंधी इचलकरंजीतील एका वकिलाने उच्च न्यायालयात तक्रारी केल्या. त्यामुळे प्रकल्प सुरू होण्यास अडचणी आल्या. कोरोनामुळे त्यात भर पडली. त्याचा निकाल मिल्सच्या बाजूने लागला. परंतु नंतर करावी लागणारी गुंतवणूक न करता ते भागीदारीतून बाहेर पडले. त्यामुळे हा प्रकल्पही चालला नाही तोपर्यंत मोहिते यांचेही निधन झाले. मी केलेली गुंतवणूक व्याजासह परत करावी असे आवाडे यांची मागणी आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून त्यांनी त्यासाठी तगादा लावला आहे. परंतु पैसे न मिळाल्याने मंगळवारी कुलूप तोडून मिल्समध्ये घुसले. तेथील कामगारांशी त्यावरून थोडी वादावादी झाली. 

हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनींग मिल्स येथे तणावाचे वातावरण आहे. आवाडे समर्थक कंपनीच्या गेटवर असून त्यांनी जेसीबी थेट कंपनीच्या गेटवर आणला. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी स्वतः डीवायएसपी आणि इतर अधिकारी पोलीस बंदोबस्तात दाखल झाले आहेत. कंपनीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.