प्रत्येक भागात काही ना काही समस्या या असतात. मग त्या पाणी, वाहतूक, अतिक्रमण, पार्किंग याबाबतीत असो त्यावर मग सर्वांनुमतीने उपाय देखील केले जातात. सध्या पाण्याचा तसेच सौरऊर्जा प्रकल्प यावरून देखील अनेक प्रश्न समस्या आहेत. रेंदाळ येथील जनरल ग्रामसभेत पिण्याच्या पाण्याचा मुद्दा चांगलाच कळीचा ठरला. लिकेजमुळे दहा ते बारा दिवस पाणीपुरवठा न झाल्याने हुपरी नगरपरिषदेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी आणले त्याचा पुरवठा सामाजिक कार्यकर्ते प्रभागामध्ये करत असताना कुरघोडीच्या राजकारणापायी काही सदस्यांना ते खटकलं.
अचानक ग्रामपंचायतीचा टँकर देण्यास टाळाटाळ केली त्या सदस्यांची नावे गाव सभेत सांगा. सौर प्रकल्पाचे उद्घाटन गडबडीने का केला? किती शेतकऱ्यांची उपस्थिती होती, प्रकल्प राबवताना शेतकरी गावसभेत ज्या मागण्या केल्या होत्या त्याचा पाठपुरावा केला का ? अशा खरमरीत प्रश्नांचा भडीमार शरद पाटील यांनी केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुप्रिया पाटील होत्या. सभेचे विषयाचे वाचन ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी यांनी केले.
गावसभा चालू असताना प्रश्नांची उत्तर द्यायला प्रशासनाची जबाबदारी आहे पण गावाने निवडून दिलेले सदस्य व्यासपीठ सोडून खाली का बसल्यात? वैभव पाटील यांनी खाली बसलेल्या सदस्याला व्यासपीठावर बसण्याचा इशारा दिला त्यावर त्यातील एका सदस्याने आम्ही बघतो कुठे बसायचं, तुम्ही सांगू नका यावरून शाब्दिक चकमक होऊन जोरदार खडाजंगी होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला.
मिळकतीच्या नोंदी घालताना तोंड बघून घालू नका असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मी तशी कोणतीही नोंद घातली नाही तस आढळल्यास गावसभा जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल पण कोणत्याही अरेरावीला उत्तर देणार नाही. साठे खत नोटरी नोंदी शासनाने थांबवल्या आहेत त्यावर मार्गदर्शन घेऊ असे ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी यांनी सांगितले.
सिद्धिविनायक कॉलनीतील रस्त्यांच्या नोंदी वीस वर्षे झाली अजून का केल्या नाहीत ? ही कॉलनी रेंदाळमध्ये येत नाही काय ? असा प्रश्न डॉ. विनायक मेथे यांनी उपस्थित केला. गावठाण सोडून इतर भागातील ओपन जागा, मिळकतींना जोडणारे रस्ते वरिष्ठ प्रशासनाकडून मार्गदर्शन घेऊन ग्रामपंचायतीकडे वर्ग करा सचिन मेथे , किरण वाळके यांनी सुचित केले. यावर प्रशासनाकडून इतरत्र नोंदी शासकीय नियमानुसार नोंद करून घेण्याचा ठराव सर्वांनुमते संमत करण्यात आला.
सांडपाणी, घनकचरा प्रकल्प, खेळासाठी क्रीडांगण उपलब्ध करून द्यावे, १५ वा वित्त आयोगाचा निधी गेली दोन वर्षे पडून का आहे, वेळेत पाणीपुरवठा व्हावा, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय सौरऊर्जा प्रकल्प सुरू करू नये, घर, इमारत यांची फेर मोजणी होऊन कर आकारणी करावी आदी प्रश्नांवर जोरदार चर्चा झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.