शिवनाकवाडी सलाईनवर: विषबाधितांवर आयजीएममध्ये उपचार; आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर

शिवनाकवाडी येथे श्री माता कल्याणताई देवीच्या यात्रेस मंगळवार दि. ४ फेब्रुवारी पासून आरंभ झाला. मंगळवारी दुपारी गव्हाची खिर, भात, आमटी आणि आंबिल अशा पदार्थांचा महाप्रसाद झाला. रात्री नागरिकांनी आपापल्या घरात भोजन केले. पण, मंगळवारची मध्यरात्र संकट घेऊनच उभी राहिली आणि बुधवार सुरु झाल्यापासून शिवनाकवाडीतील घराघरातील ग्रामस्थांना अचानक घाम येऊ लागला, उलट्या सुरु झाल्या, जुलाबही सुरु झाले. यामुळे लोक भयभीत झाले, ग्रामपंचायतीच्या मोकळ्या आवारात जमले, क्षणात रुग्णालय गाठले, रुग्णालयेही खचाखच भरली, कोण आजारी आहे आणि कोण नाही हेच कळायला मार्ग नव्हता. लहान मुले, महिला, जेष्ठ नागरिक आणि तरुणांनाही या आजाराने कवटाळले.

सरकारी यंत्रणा क्षणात पोहोचली माता कल्याणताई देवीकडे आशीर्वाद मागितला गेला आणि लोकांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आणि मदतीला सरकार धावले. शिवनाकवाडी येथे ग्रामदैवत श्री माता कल्याणताई देवीच्या यात्रेत जवळपास १००० जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात विषबाधा झालेल्या ९ बालकांसह ७० जणांवर उपचार सुरु असून यापैकी दोघांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयात विषबाधित रुग्ण मोठ्या संख्येने दाखल झाल्याने रुग्णालयातील यंत्रणा तात्काळ अॅक्शन मोडवर येवून तात्काळ औषधोपचार सुरू केले. अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे- पाटील, पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे यांनीही रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. बाधितांची संख्या वाढतच चालल्याने आसपासच्या गावासह इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मोठ्या संख्येने विषबाधित रुग्ण दाखल होऊ लागल्याने रुग्णालय प्रशासनाचीही तारांबळ उडाली. मात्र रुग्णालय प्रशासनाने तातडीने सर्व वैद्यकिय अधिकारी, परिचारीका, परिचारक, कर्मचारी यांना एकत्र बोलावून उपचार यंत्रणा कार्यान्वित केली. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन १०० रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला. त्याठिकाणी या रुग्णांवर उपचार सुरु केले. तर आवश्यक औषधसाठाही उपलब्ध करुन घेण्यात आला आहे. रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील व त्यांच्या सर्व टीमने तातडीने उपचार यंत्रणा राबवत औषधोपचार सुरु केल्याने तातडीने उपचार मिळून अनेक रुग्णांना दिलासा मिळाला. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासह काही खाजगी रुग्णालयातही बाधित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. तर शिवनाकवाडी परिसरातील दवाखान्यातही अनेकांवर उपचार सुरु आहेत.