आष्ट्यातील महसूल अधिकाऱ्यांची चंद्रशेखर बावनकुळे घेणार बैठक

आष्टा येथील सव्हें नं. ४, ६ व मधील नागरिकांच्या बिगरशेती मिळकतीवरील वर्ग २ ची शर्त कमी करून जमिनी वर्ग १ करणेच्यादृष्टीने महसूलमंत्री यांच्या दालनात संबंधित अधिकारी आणि मिळकतधारक यांची बैठक बोलावणेच्या मागणीचे निवेदन निशिकांत भोसले – पाटील, प्रवीण माने यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच बैठक आयोजित करून हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले असल्याचे भाजपा युवा मोर्चा वाळवा तालुका अध्यक्ष प्रवीण माने यांनी सांगितले. 

ते म्हणाले, निशिकांत भोसले पाटील यांनी बावनकुळे यांना निवेदन दिले आहे की, आष्टा येथील स.नं. ४, ६ व ९मधील जमिनी १९३१ साली सरकारी लिलावात लिलाव कब्जाहक्क रक्कम भरून खरेदी केल्या आहेत. १९७५ साली या क्षेत्राचा जिल्हाधिकारी सांगली यांनी बिगरशेती आदेश केला आहे. या ठिकाणी १५०० हून अधिक मिळकत धारक असून महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ प्रमाणे प्लॉट नियमित केले आहेत. गेली ४० वर्षांपासून हे मिळकती धारक राहत्या घरांचा, रिकाम्या प्लॉटचा शॉपिंग गाळ्यांचा शासकीय कर नियमित भरत आहेत.

या क्षेत्रामध्ये नगरपालिकेने अंतर्गत रस्ते, गटर पाणी आदी सुविधा दिल्या आहेत. मात्र उपविभागीय अधिकारी वाळवा विभाग इस्लामपूर यांनी अविभाज्य शर्तीचे कारण दाखवून २९ डिसेंबर २०१० रोजी ४, ६ व ९ मधील जमिनी व्यवहार पूर्ण परवानगी घेतलेशिवाय न करणेबाबतचा आदेश दुय्यम निबंधक आष्टा यांना केला आहे. यामुळे व्यवहार होत नसल्याने मिळकत धारकांचे आर्थिक नुकसान होण्याबरोबर शासनाचा महसूल ही कमी होत आहे.