महिलांच्या शासकीय योजना लोकाभिमुख करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत रविवार दि. ३ मार्च रोजी इचलकरंजीजवळील कोरोची येथे जिल्ह्यातील महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीसाठी शनिवारी आढावा बैठक घेऊन नियोजनाबाबत सूचना देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सूचना सर्व संबंधित विभागांना दिल्या. बैठकीस खा. धैर्यशील माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अति.जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, माविम जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी खा. माने यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत प्रशासनाला आवश्यक सूचनाही केल्या.
प्रत्येक तालुक्यातून महिलांना आणण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उपस्थित राहणार असल्याने या मेळाव्यात नारी शक्ती दर्शन होणार आहे.