इचलकरंजीत डॉ. राहुल आवाडे युवा शक्तीतर्फे आयोजित दहीहंडी शिरोळच्या ‘अजिंक्यतारा’ने फोडली!

डॉ. राहुल आवाडे युवा शक्तीच्या मानाच्या दहीहंडी स्पर्धेत अजिंक्यतारा तरुण मंडळ शिरोळ संघाने बाजी मारली. तब्बल सहा थर लावून दहीहंडी फोडली आणि तीन लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस नावे केले. सलामीपासून पाच थराच्या पुढे न जाणाऱ्या तिन्ही संघांची चौथ्या फेरीत उमेद वाढली आणि प्रचंड चुरस, उत्कंठा, नागरिकांची हुरहूर याची वेळ साधत अखेरच्या संधीत अजिंक्यताराने दहीहंडी फोडली.

सायंकाळी पाचपासून यशोलक्ष्मी सांस्कृतिक भवन लगतच्या मोकळ्या मैदानात दहीहंडीचा माहोल सुरू झाला. शिरोळ येथील तीन गोविंदा पथके सहभागी झाली होती. सुरुवातीला चिठ्ठ्या टाकल्यानंतर तिन्ही संघ ५० फुटांवर सलामीसाठी सज्ज झाले. पहिल्यांदा सलामीलाच अजिंक्यतारा तरुण मंडळाने सहा थर लावत उत्सुकता वाढवली. त्यानंतर गोडीविहीर एस. पी. ग्रुप आणि हनुमान तालीम मंडळाने प्रत्येकी पाच थर लावले.

दरम्यान, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, डॉ. राहुल आवाडे, जनता बँकेचे अध्यक्ष स्वप्नील आवाडे, मोसमी आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार आवाडे यांच्या हस्ते चिठ्ठ्या टाकून पहिल्या फेरीला सुरुवात झाली.

मात्र, अनुक्रमे अजिंक्यतारा, गोडी विहीर, हनुमान तालीम मंडळाने पाचव्या थरापर्यंत मजल मारत प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यामुळे आयोजकांनी दुसऱ्या फेरीला पाच फूट, तिसऱ्या फेरीत तीन फुटांनी दहीहंडी खाली घेऊनही तिन्ही संघ दहीहंडी फोडण्यापासून दूर राहिले. हनुमान तालीम मंडळाने सहा मनोरे रचत जिंकण्याची उमेद जागी केली. चौथ्या फेरीत दहीहंडी ३५ फुटांवर घेत दोन फूट खाली घेण्याचा निर्णय घेतला.

पहिली संधी मिळालेल्या गोडी विहीर संघाने सात थर रचले आणि दहीहंडी फोडण्यासाठी बाल गोविंदा उभा राहणार तोपर्यंत मनोरा कोसळला. त्यानंतर हनुमान तालीम मंडळाने सहा थर लावले. मात्र, प्रयत्न अपुरे पडले. अखेरची संधी मिळालेल्या अजिंक्यतारा तरुण मंडळाने नियोजनपूर्वक सहा थर लावले आणि चपळरीत्या बालगोविंदा विवेक कुंभारने हांडीवर काठी मारून विजय अजिंक्य केला.

विजेत्या संघास ३ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.विधानसभेसाठी इच्छुक असलेले डॉ. राहुल आवाडे यांनी जमलेल्या प्रचंड समुदायासमोर दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने भाषण केले नाही. विशेष म्हणजे आमदार आवाडे यांनीही भाषण केले नाही. केवळ व्यासपीठावरून राहुल आवाडे यांनी थेट दहीहंडी फोडली.