शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे मंजूर केल्याबद्दल आमदार पडळकर यांचा तालुका भाजपच्यावतीने विटा येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी जयंतरावांचं अजून पण तळ्यात मळ्यात आहे. त्यांना कुठे जायचं आहे, हे नक्की नाही, पण मी आणि सदाभाऊ त्यांना ताकदीने विरोध करणारच, अशा शब्दांत आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या कथित भाजप प्रवेशाला जाहीर विरोध दर्शविला आहे. व्यासपीठावर माजी मंत्री सदाशिव खोत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, डॉ. रवींद्र आरळी आदी उपस्थित होते. आमदार पडळकर म्हणाले, आपल्याकडे लढणारे आणि विरोधकांना लोळवणारे उमेदवार आहेत. अशा उमेदवारांच्या पाठीशी आपण ताकदीने उभाणार आहोत.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत मला इथून लढता आले नाही, मात्र तरीही तुम्हाला निधी कमी पडणार नाही. खानापूर मतदारसंघासाठी वेगळा निधी आपण मंजूर करून आणू. जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कामाला लागा. सदाभाऊ खोत म्हणाले, गोपीचंद पडळकर हे जनतेतून आमदार होऊ शकतात, हे जतच्या जनतेने दाखवून दिले. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पडळकर यांनी राजकारणात भरारी घेतली. पृथ्वीराज देशमुख म्हणाले, भाजपची सत्ता नसताना ढाल बनून आमदार पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी पक्षासाठी काम केले. जिल्ह्यात भाजप ताकदीने वाढवायची आहे. पडळकर लढवय्ये आमदार आहेत. ब्रह्मानंद पडळकर म्हणाले, खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना ताकद द्यायला पडळकर बंधू कमी पडणार नाहीत. शहरात आम्हाला कार्यकर्ते मिळत नव्हते, पण आता लोकांना आमचे काम समजले आहे.
