आपल्यापैकी बऱ्याचजणांचे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास असतात. उपवास म्हटला की काही ठराविक पदार्थच आपण खाऊ शकतो. या पदार्थात साबुदाणा, भगर, शेंगदाणे, बटाटा, रताळी असे मोजकेच पदार्थ असतात.
हे ठराविक पदार्थ वापरूनच आपण उपवासाचे पदार्थ तयार करतो. यातही साबुदाण्याची खिचडी, खीर, वरीचा भात, बटाटाच्या चिवडा, रताळ्याचे काप, बटाट्याची सुकी भाजी असे कॉमन ठरलेलेच पदार्थ असतात. परंतु प्रत्येक वेळी तेच ते पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी हेच उपवासाचे ठराविक पदार्थ वापरुन जर आपल्याला एक नवीन पदार्थ बनवता आला तर वेगळं खाल्ल्याचा आनंद मिळतो.
‘इडली’ हा असा पदार्थ आहे की जो आपण कधीही खाऊ शकतो. मऊ, लुसलुशीत, सॉफ्ट इडली चटणीसोबत खायला अतिशय चविष्ट लागते. ‘इडली’ हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ. ताटात गरमागरम इडली असेल की अनेकदा आपल्याला त्याच्या सोबत काहीही नसले तरी चालते.
मऊ-लुसलुशीत इडल्यांवर ताव मारुन आपले पोटही छान भरते. उपवासाच्या दिवशीही (Upvasachi Idli) आपल्याला अशीच इडली आणि चटणी खाता आली तर…आपण उपवासाचे हेच नेहमीचे पदार्थ वापरून उपवासाची झटपट होणारी इडली तयार करु शकतो. यंदाच्या मार्गशीर्ष उपवासाची इडली नक्की ट्राय करुन पाहाच.
साहित्य :-
१. साबुदाणा – १ कप
२. भगर – १ कप
३. दही – १ कप
४. मीठ – चवीनुसार
५. इनो – १ टेबलस्पून
६. तेल – २ ते ३ टेबलस्पून
७. पाणी – गरजेनुसार
कृती :-
१. सर्वातआधी एका मोठ्या बाऊलमध्ये साबुदाणे घेऊन ते किमान ७ ते ८ तास भिजत ठेवावेत.
२. आता मिक्सरच्या भांड्यात भगर घेऊन ती मिक्सरमध्ये २ ते ३ मिनिटे फिरवून त्याचे एकदम बारीक पीठ तयार करुन घ्यावे.
३. हे भगरचे बारीक करून घेतलेले पीठ एका बाऊलमध्ये काढून घेऊन त्यात ताजे घट्ट दही घालावे.
४. मग या मिश्रणात भिजवून घेतलेले साबुदाणे घालावेत.
५. आता या तयार मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून त्याचे माध्यम कन्सिस्टंन्सीचे बॅटर बनवून घ्यावे.
६. सगळ्यांत शेवटी या बॅटरमध्ये इनो व चवीनुसार मीठ घालून घ्यावे.
७. आता हे बॅटर चमच्याच्या मदतीने ढवळून एकजीव करुन घ्यावे.
८. त्यानंतर इडली पात्राला तेल लावून त्यात हे बॅटर ओतून या उपवासाच्या इडल्या वाफवण्यासाठी इडली पात्रांत ठेवून द्याव्यात.
९. १५ ते २० मिनिटे या इडल्या छान वाफवून घ्याव्यात.
आपल्या उपवासाच्या इडल्या खाण्यासाठी तयार आहे. या उपवासाच्या गरमागरम इडल्या शेंगदाणा व खोबऱ्याच्या चटणी सोबत खाण्यासाठी सर्व्ह कराव्यात.