इचलकरंजीत ११ केंद्रांवर बारावी परीक्षेस प्रारंभ! ९ हजार ११७ विद्यार्थ्यांची उपस्थिती

कालपासून बारावीची परीक्षा सुरु झालेली आहे. त्यामुळे सर्वत्र परीक्षा केंद्रावर कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे. इचलकरंजी शहरात देखील पोलिसांची करडी नजर आहे. इचलकरंजी विभागात एकुण ११ केंद्रावर ९ हजार ११७ विद्यार्थी-विद्यार्थीनी परीक्षेला बसले आहेत. पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपर शांततामय वातावरणात पार पडला. विद्यार्थी दशेतील उच्च शिक्षणाची पायरी समजली जाणारी बारावी परीक्षेला बुधवारपासून सुरवात झाली आहे. इचलकरंजी विभागात ११ परीक्षा केंद्रे असून याठिकाणी ९ हजार ११७ परीक्षार्थीची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यामध्ये दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे ६४५, गर्ल्स हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेजचे १४५३, श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे १११३, दत्ताजीराव कदम कनिष्ठ महाविद्यालयाचे ११६५, श्री. संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज रुकडीचे १०४९, हुपरी इंग्लिश स्कूल टेक्निकल ज्युनिअर कॉलेजचे ६६४, आण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगलेचे ३३०, इचलकरंजी हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचे ९२५, बालाजी विद्यालयाचे ५००, तात्यासाहेब मुसळे विद्यालयाचे ६१३ आणि शरद सायन्स अॅन्ड कॉमर्स ज्युनिअर कॉलेजच्या ६६० विद्यार्थी- विद्यार्थीनींचा समावेश आहे.

सकाळी सर्वच परीक्षा केंद्रासमोर विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही गर्दी केली होती. त्यामुळे मुख्य मार्गासह सर्वच शाळा परिसरात झालेल्या गर्दीमुळे वाहतूकीचा खोळंबा झाला होता. ही परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

परिक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता समितीसह भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून हे पथक केंद्रातील शाळांना सतत भेटी देऊन विशेष लक्ष ठेवत आहेत.