सांगोला तालुक्यातील महूद येथे आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण , प्रकृती स्थिर

सध्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न खूपच काळजीनिहाय पहायला मिळत आहे. आरोग्याच्या बाबतीत अनेक नवनवीन आजार डोके वर काढताना दिसत आहेत. सध्या जीबीएस हा आजार भरमसाठ वाढत आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबई, सोलापूर व इतर ठिकाणी जीबीएसचे रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार दूषित पाणी, अन्नपदार्थ खाण्यामुळे बळावतोय. त्यामुळे आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्यासाठी आवाहन केले आहे. सांगोला तालुक्यातील महूद गावात ३२ वर्षीय जीबीएसचा पहिला रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागामार्फत तातडीने गावात होम टू होम भेटी देऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. दरम्यान या रुग्णावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान महूद गावात ३२ वर्षीय जीबीएसचा पहिला रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. साधारण कमरेखालील भागास अशक्तपणा येणे, पायांना मुंग्या येणे, जुलाब होणे, सांधे दुखणे अशी लक्षणे जीबीएस आजाराची आहेत. दरम्यान महूद गावात आरोग्य विभागामार्फत संबंधित जीबीएस रुग्णाची दखल घेऊन घरातील पाण्याचे नमुने तपासणी तसेच गृहभेटी देऊन कोणास अशी लक्षणे आहेत का, याविषयी माहिती घेऊन आजाराविषयी जनजागृती सुरू केली आहे. या आजाराबाबत घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी दूषित पाणी पिऊ नये. बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे, स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर यांनी केले आहे.