सध्या अनेक भागात अतिक्रमण वाढलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ या ठिकाणी देखील अतिक्रमण खूपच वाढलेले आहे. रेंदाळ शहरात खुले प्लॉट, जागा या हेतूपुरस्सर लाटलेल्या आहेत. सगळीकडे बकाल वस्ती दिसून येत आहे. पायाभूत सुविधा देण्यात अडचणी येत आहेत. रस्ते गटारींचा पत्ताच नाही. जिकडे तिकडे नागरी समस्या आ वासून उभ्या आहेत. याबाबत रघुनाथ पाटील यांनी कृती समितीच्या माध्यमातून फार मोठा लढा दिला होता. हे दुर्लक्षीत करुन चालणार नाही. अशी अतिक्रमण करणारी टोळीच तयार झाली आहे.
रस्त्यावरच्या खोक्यांना फार मोठा भाव आहे. याबाबतीत सार्वजनीक बांधकाम विभागाची भूमिका संशयास्पद दिसून येते मात्र रस्ते छोटे झाल्याने वाढत्या रहदारीचा सामना सामान्य माणसाला करावा लागत असून वेळप्रसंगी जीवाला मुकावे लागत आहे, हे वास्तव आहे. प्रत्येक प्रभागातील खुल्या जागांची विल्हेवाट लावण्यासाठी काही लोकांनी फार मोठे पराक्रम गाजवले आहेत. ग्रामदैवत श्री बिरदेव मंदीराला जाणारा हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने खुप सोयीचा आणि मुख्य रस्त्याला जोडणारा जवळचा मार्ग आहे. या रस्त्यावर वाहतूक सुरू झाली की झेंडा चौक, भगतसिंग रोड या गावांमधील अंतर्गत रस्त्यावर होणारी वर्दळ कमी होण्यासाठी मदत होणार आहे. दसरा, दिवाळी व यात्रा काळात मंदिरात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
भाविकांची प्रचंड गर्दी होते, यामुळे गावातील अंतर्गत रस्ते छोटे झाल्याने वाहतूकीची कोंडी बघायला मिळते तसेच चालण्यासाठी रस्ताच शिल्लक रहात नाही. यामध्ये महिला, लहान मुले व वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांचे फार हाल होतात. याकरिता भविष्याचा विचार करता या रस्त्याची गरज आहे. रस्ता अडवून बांधकाम करणारे फौजदारी गुन्ह्यास पात्र आहेत तेव्हा याबाबत कायदेशीर मार्गाने अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी जोर धरत आहे.
अतिक्रमण काढण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झाल्याने सरपंच सौ. सुप्रिया पाटील, इतर ग्रामपंचायत सहकारी सदस्य व ग्रामसेवक एकनाथ सुर्यवंशी यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले जात असले तरी ते समाधान कायमस्वरूपी टिकण्यासाठी आता कठोर भूमिकेची गरज आहे. पुढील कामकाज सुरू करण्यासाठी सभागृहातील सदस्यांनी हातात हात घालून या अतिक्रमणाचे उच्चाटन करण्यासाठी एकजूट कायम ठेवावी अन्यथा हा अतिक्रमण काढण्याचा इव्हेंट ठरला तर जनता रस्त्यावर उतरून प्रचंड विरोधात जाईल अशी चर्चा नागरिकांमधून दिसून येत आहे.