इचलकरंजीत गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर साठा जप्त! ५६ सिलेंडरसह ५ लाख ७६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

सध्या गुन्हेगारीच्या प्रकारात खूपच वाढ झालेली आहे. अवैद्य धंदे, अपघात तसेच चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. इचलकरंजी शहरात देखील या घटना खूपच वाढलेल्या आहेत. इचलकरंजी येथील आर. के. नगर परिसरात अवैधरित्या गॅस सिलेंडरचा साठा करुन तो बेकायदेशीरपणे वाहनात भरला जात असताना दहशतवाद विरोधी शाखा कोल्हापूरच्या पथकाने कारवाई केली. त्यामध्ये ५६ गॅस सिलेंडर, १ रिक्षा, १ मालवाहतूक टेम्पो व अन्य साहित्य असा ५ लाख ७६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी शकिल रफीक अरब (वय ५२ रा. कृष्णानगर शहापूर), टेम्पोचालक अरिफ बाबुसाहेब शेख (वय २१ रा. इंदिरानगर) आणि रिक्षाचालक दत्ता बचाराम नलवडे (वय ४५ रा. तोरणानगर) या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजी- जयसिंगपूर रोडवरील आर. के. नगर परिसरात रस्त्यालगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आला आहे. हा गॅस अत्यल्प दरात वाहनांमध्ये भरला जात असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती.

त्यानुसार शनिवारी कोल्हापूर शाखा पथकाने सदर  ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी शकिल अरब व अरिफ शेख यांनी अवैधरित्या काळ्या बाजाराने गॅस सिलेंडर आणून त्याचा साठा केल्याचे व तो बेकायदेशीरपणे वाहनात भरत असल्याचे निदर्शनास आले. तर दत्ता नलवडे हा रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी आल्याचे मिळून आले. पोलिसांनी या कारवाईत १५ हजार किंमतीचे ६ गॅस सिलेंडर, ४५०० रुपयांचा वजन काटा, १० हजाराची
विद्युत मोटार, १ हजाराचे २ पितळी नोजल, पट्टीपाना, १ लाख रुपये किंमतीची रिक्षा (क्र. एमएच ०८ एक्यु ४४६७) आणि ४.४५ लाखाचा भरलेली सीलबंद ४५ व रिकामी ५ अशा ५० सिलेंडरसह मालवाहतूक टेम्पो (क्र. एमएच ०९ इएम ९४४०) आणि १२५० रुपयांची रोकड असा ५ लाख ७६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी तिघांना शहापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.