सध्या सर्वत्र खून, मारामारी, तसेच अवैद्य धंदे यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. तसेच किरकोळ कारणातून होणारी भांडणे खूपच मोठे रूप धारण करून यामध्ये अनेकांचा प्राण देखील जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. इचलकरंजी शहरात देखील गुन्हेगारी खूपच वाढलेली आहे. एका तरुणीला इन्स्टाग्राम अकाउंटवरून फॉलो केल्यावरून कबनूर येथे व्हॅलेंटाईन डेच्या रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी तलवारीने हल्ल्यात एका तरुणाच्या कानाला गंभीर इजा झाली.दुसऱ्या गटातील एका युवकाला डोक्यात फरशी घालून गंभीर मारहाण करण्यात आली. हा प्रकार शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास कबनूर फॅक्टरी रस्त्यावरील एका खाद्यपदार्थ गाड्यासमोर घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी हल्ल्यात यश दिलीप काटकर (वय २०, रा. संतोषीमाता मंदिर, माळभाग, कबनूर) गंभीर जखमी झाला आहे.त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. डोक्यात फरशीचा घाव बसल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रीतम प्रकाश शेटके (रा. फॅक्टरी रस्ता, कबनूर) याला सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात प्रीतम प्रकाश शेटके, प्रकाश वसंत शेटके (दोघे रा. साठेनगर, कबनूर), यश काटकर, योगेश बाजीराव कांबळे, शुभम प्रकाश पवार, लकी खान (सर्व रा. कबनूर) यांचा समावेश आहे. यातील शेटके, योगेश कांबळे, शुभम पवार, लकी खानला अटक करून न्यायालयात हजर केले. यातील शेटकेला ता. १८ पर्यंत, तर अन्य तिघांना ता. १७ पर्यंत कोठडी मिळाली आहे.
फिर्यादी यश काटकर याने इन्स्टाग्राम प्रकरणातून शेटकेला जाब विचारला. यावरून वाद वाढत गेला आणि दोघांमध्ये हातापायी सुरू झाली. या भांडणात शेटकेने यशला मारहाण केली. त्याचवेळी प्रीतमचे वडील प्रकाश शेटके यांनी यशवर तलवारीने हल्ला केला. यशने तो वार चुकवण्यासाठी उजव्या बाजूला झुकण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच्या डाव्या कानावर तीव्र वार बसला. यामुळे त्याच्या कानाला गंभीर इजा झाली आणि डोक्याला दुखापत झाली. घटनेनंतर जखमी यशला त्याच्या मित्रांनी तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, यश काटकरच्या बाजूने आलेल्या युवकांनी शेटकेवरही हल्ला केला. याप्रकरणी फिर्यादी प्रकाश वसंत शेटके (वय ५७, कबनूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश काटकरसह योगेश कांबळे, शुभम पवार, लकी खान यांनी मिळून शेटकेवर हल्ला केला. यामध्ये दगडी फरशी डोक्यात घातल्याने शेटकेच्या डोक्याला, उजव्या डोळ्याला व तोंडावर गंभीर दुखापत झाली. या प्रकारानंतर कबनूर परिसरात तणावाचे वातावरण होते.