हातकणंगले तालुक्यातील तळसंदेतील १७ लाख चोरी प्रकरणी अद्याप धागेदोर नाहीत…

हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथे चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री धुमाकूळ घालत घरफोड्या करत साडेअठरा तोळे सोने व रोख पन्नास हजार रुपये लंपास केले. चोरट्यांनी चार घरे फोडली. मात्र, दोन घरांमध्ये त्यांच्या हाती काहीही लागले नाही. यावेळी नवजीवन दूध संस्थेचा सायरन वाजवल्याने गाव जागा झाला. त्यामुळे अन्य ठिकाणी चोरीचा प्रकार टळला. या घटनेने तळसंदे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रविवारी जिल्हा पोलीसप्रमुख पंडित यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना सूचना केल्या. याप्रकरणी पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

तळसंदे येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी प्रथम माणिक बापूसो मोहिते यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला; मात्र घरातील लोक जागे असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तेथून पलायन केले. यानंतर महादेव राजाराम चव्हाण यांच्या शेतातील घरात कुलूप तोडून प्रवेश केला. त्या घरात काहीच न मिळाल्याने तेथील कुऱ्हाड व कोयता घेऊन गेले. यानंतर त्यांनी प्रदीप मारुती चव्हाण यांच्या घरातील आतून असणारी कडी कटावणीने तोडली व प्रवेश केला. आवाजाने घरातील लोक जागे झाल्याने चोरट्यांनी प्रदीप चव्हाण यांच्या आईच्या गळ्यात असलेली सोन्याची चेन हिसकावून घेऊन पलायन केले. यानंतर चोरट्यांनी बाळासाहेब चौगुले (वाठारकर) यांच्या घराला कुलूप असल्याचे पाहून कुलूप तोडत घरात प्रवेश केला.

मात्र, घरात चौगुले यांची सून प्रीतम सुधीर चौगुले व नात सिद्धी सुधीर चौगुले या होत्या. त्यांच्या गळ्याला कोयता व चाकू लावत तिजोरी फोडून अठरा तोळे दागिने व रोख पंचेचाळीस हजार रुपयांची लूट केली. चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असतानाच नवजीवन दूध संस्थेचा भोंगा वाजवण्यात आल्याने चोरट्यांनी गावातून पलायन केले. या जबरी चोरीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा पोलिसप्रमुखांसह अधिकाऱ्यांनी चोरी झालेल्या ठिकाणी भेटी देऊन तपासाची चक्रे फिरविली आहेत. वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास भोसले अधिक तपास करत आहेत.