सद्या अनेक भागातील समस्या सोडविण्यासाठी नागरिकांकडून मागणी केली जाते. मात्र काही वेळा या मागण्या मान्य केल्या जातात तर काही वेळा या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथे चार महिन्यांपासून ग्राम अधिकारी नसल्याने गावातील विविध विकासकामांना खीळ बसली होती. यासाठी वारंवार मागणी करूनही ग्राम अधिकारी न दिल्याने प्रशासनाचा निषेध करत माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, सरपंच शामबाला माळी व इतर सदस्य इस्लामपूर येथे उपोषणास बसले होते. माजी उपसभापती नेताजी पाटील यांच्या मध्यस्थीने गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, सहाय्यक गटविकास अधिकारी सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्याची पूर्णवेळ नेमणूक करू, असे आश्वासन दिल्यानंतर पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी उपोषण स्थगित केले.
वाळवा समितीच्या पंचायत आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोर उपोषणास सुरुवात केली. अधिकाऱ्याची नेमणूक व्हावी, यासाठी पाठपुरावा करूनही दखल घेतली नसल्याने पाटील उपोषणास बसले. “जोपर्यंत ग्रामपंचायतीस पूर्ण वेळ ग्रामअधिकारी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील,” असा त्यांनी पवित्रा घेतला होता. मात्र, पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल,” असे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्याने आनंदराव पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी सरपंच सौ. शामबाला माळी, ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील, अशोक पाटील, शिवानंद माळी, सचिन शेवाळे, कृष्णात पाटील, सचिन पाटील उपस्थित होते.
