हातकणंगले नगरपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा! येत्या सोमवारपर्यंत……

सध्या अनेक भागात विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वेळा या अडचणी सोडविल्या जातात तर अनेक वेळा या मागण्या अपूर्णच राहतात. सध्या अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. वारंवार बिघडणाऱ्या मोटरी, दुरुस्तीच्या नावाखाली सुरू असलेली टाळाटाळ आणि अनियमित पाणीपुरवठा यामुळे संतप्त नागरिकांनी आता नगरपंचायतीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

येत्या सोमवारपर्यंत नियमित पाणीपुरवठा न झाल्यास नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढून कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. नगर पंचायतीने पाणीपुरवठा दिवसाआड करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र सध्या आठ-आठ दिवस पाणी मिळत नाही. नदीवर दोन मोठ्या मोटरी असतानादेखील त्यांची वेळेवर देखभाल होत नाही. एक मोटर बंद पडली, तर दुसरीही सुरळीत चालत नाही. अधिकारी आणि कर्मचारी बंद पडलेली मोटर वेळेवर दुरुस्ती करत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

यावेळी नगरपंचायतीच्या अधिकारी आसावरी सुतार यांनी, घाईघाईत दुरुस्त केलेली मोटर एक दिवसही टिकत नसल्याचे सांगितले. जर दुरुस्ती टिकत नसेल, तर वेळ आणि पैसा वाया घालवण्याचा उपयोग काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अधिकारी वेळेवर येत नाहीत, नागरिकांच्या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही करण्यात आला.

सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढून कुलूप ठोकले जाईल आणि जो गुन्हा होईल तो अंगावर घेऊ, असा थेट इशारा दिला आहे. यावेळी विजय चौगुले, दीपक वाडकर, मिलिंद चौगुले, दीपक कुन्नुरे, विजय निंबाळकर, अतुल मंडपे, बत्तू जाधव आदी उपस्थित होते.