इस्लामपुरात भरदिवसा फिल्मी स्टाईल थरार! तरुणावर खुनी हल्ला 

सध्या प्रत्येक भागात गुन्हेगारीच्या प्रकारात भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र दिसतच आहे. खून, मारामारी अगदी सऱ्हास राजेरोसपणे सुरु असल्याचे दिसत आहे. असाच एक फिल्मी स्टाईल खुनाचा थरार इस्लामपूर येथे अनुभवायला मिळाला. गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीच्या टोळक्याने धारदार शस्त्रे नाचवत विनोद उर्फ बाल्या रामचंद्र माने वडार ( वय विनोद वडार २२, रा. वडार गल्ली, इस्लामपूर) या तरुणांवर पाठलाग करत खुनी हल्ला केला. भर दुपारी दीडच्या सुमारस हा प्रकार घडला. जखमी विनोदचे दोन मित्र दुचाकी सोडून पळाल्याने ते बचावले. धारदार शस्त्रे हातात घेऊन नाचवणारे टोळके पाहून चव्हाण कॉर्नर परिसरात दहशत निर्माण झाली होती. फिल्मी स्टाईल थरार अनेकांनी अनुभवला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अशी  विनोद उर्फ वाल्या माने वडार हा त्याचे मित्र जुबेर मुजावर व प्रवीण लोखंडे यांच्याबरोवर दुचाकीवरून शेतात जेवण करण्यासाठी निघाले होते. गाडीमध्ये तेल नसल्याने पेट्रोल टाकण्यासाठी पेठ रस्त्यावर निघाले होते. शिराळा नाका येथून दवा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. आपला पाठलाग होतोय हे लक्षात आल्यावर विनोद वडार याने गाडी चव्हाण कॉर्नर शेजारील पेट्रोल पंपात घेतली. आणि जीव वाचवण्यासाठी समोर असलेल्या दुचाकीच्या शोरूममध्ये धाव घेतली. हातात शस्त्र असणारे टोळके पाहून पेठ रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची गर्दी जमली.

दरम्यान विनोद वडार एकटाच शोरूमच्या पाठीमागील दरवाजाने जीव वाचवण्याच्या हेतूने ‘मला वाचवा मला वाचवा’ म्हणत पेट्रोल पंपाच्या मागे रिकाम्या प्लॉटकडे धावला. तेव्हा भिंतीवर उडी मारून जाणाऱ्या विनोदला हल्लेखोरांनी पाहिले. आणि त्याच्यावर हल्ला करण्याच्या दृष्टीने पाठलाग केला. जीव वाचवण्याच्या दृष्टीने पंपाच्या मागे असणाऱ्या किसान कृषी या दुकानाच्या शेडमध्ये आत घुसला आणि शेडचा सरकता दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला.

हल्लेखोरांनी दरवाजा लावताना रोखून धरले. दुकानात आत प्रवेश करून कमरेच्या खाली सपासप वार केले. धारदार शस्त्राचे घाव घालून हल्लेखोरांनी पलायन केले. दरम्यान त्याच्यासोबत असणारे जुबेर मुजावर व प्रवीण लोखंडे हे मित्र घटनास्थळावर आले. जखमी अवस्थेत विनोदला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.