खानापूर तालुक्यातील एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पास प्रांताधिकारी यांची भेट

खानापूर तालुक्यातील घोटी बुद्रुक येथे ऍटलास कॉप्को अर्थसहायित व वॉटरशेड ऑर्गनायजेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पास प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार योगेश्वर टोम्पे व गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी भेट दिली. यावेळी सर्व अधिकारी यांनी ऍटलास कॉप्को व वॉटर संस्था यांनी राबविलेल्या प्रकल्पाविषयी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच ग्रामस्थ व शेतकरी यांना प्रकल्पात सर्वांनी सहभागी होऊन गावचा सर्वांगीण विकास करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

 याप्रसंगी गावातील १२४ कुटुंबांना ठिबक सिंचन संच, रेन पाईप संच, मिनरल मिश्रण, स्प्रे पंप, कुकुट पालन युनिट, जैविक औषधं निर्मिती किट, सायकल कोळपे इ. लाभाचे वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच सुवर्णा जाधव, उपसरपंच, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक, गावचे ग्रामपंचायत सदस्य, पाणलोट समिती अध्यक्ष उद्धव जाधव, समिती सदस्य, शेतकरी गटाचे अध्यक्ष सदस्य तसेच विकास सोसायटी चेअरमन सदस्य, पोलीस पाटील, माजी सरपंच, वॉटर संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक, सर्व स्टाफ तसेच सर्व ग्रामस्थ, शेतकरी, व लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रकल्पातून राबविण्यात येणाऱ्या महिला बचत गट यांच्या गांडूळ खत व्यवसाय निर्मिती प्रकल्पासही प्रांताधिकारी व गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन संस्थेच्या कामाची प्रशंसा केली.