हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार 

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील स्मशानभूमीत करणी, भानामतीचे प्रकार वाढले आहेत. गुरुवारी अमावास्येच्या रात्री अघोरी पूजा करण्याची तयारी चालू असताना नागरिकांची चाहूल लागताच भोंदूबाबा ने धूम ठोकली. गावची स्मशानभूमी अंबपवाडी रस्त्यालगत आहे. येथे वारंवार अंधश्रद्धा पसरवणाऱ्या घटना घडत आहेत. स्मशानात अघोरी पूजा, भूतबाधा काढणे यासह करणी, भानामती अशा पूजाकरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा उद्योग कांही नोंदूबाबा करत आहेत.

काहीवेळा चितेतील राखेचा वापर करून तंत्रमंत्र होत असल्याने गावकऱ्यांच्या भावनेशी एकप्रकारे खेळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एका बालकाच्या
चितेमधील राखेत अघोरी कृत केल्याचे रक्षा विसर्जनाच्या दिवशी निदर्शनास आले होते. गुरुवारी अमावास्येच्या रात्री सुमारे साडे अकरा वाजता स्मशानभूमीत काही जणांना संशयास्पदरीत्या वावरताना तरुणांनी पाहिले. याची माहिती त्यांनी सरपंच अच्युत खोत यांना दिली. यावेळी येथे नागरिक जमताच भोंदूबाबा पुजा अर्धवट सोडून पसार झाला. यामध्ये कणकेच्या केलेल्या सुमारे २२ बाहुल्या त्यामध्ये खोवलेले बिबे, खिळे, लिंबू, तसेच हळदीकुंकू व इतर साहित्य कागदा गुंडाळलेले आढळले.