दुधाणे यांचा बांधकामास लागणारे साहित्य वाळू, क्रमश सॅन्ड, माती पुरवण्याचा व वाहतुकीचा व्यवसाय आहे. दुधाणे यांचा डंपर (डब्ल्यू बी २९ वी ७७८६) वाठार तर्फे वडगाव येथील लक्ष्मण कुंभार यांच्या वीट भट्टीवर थांबलेला होता. यावेळी शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता चालकाने तहसीलदारने गाडी धरली असल्याचे फोनवरून सांगितले, डंपर चालक घेऊन थांबला असता, त्या जागी चार गाडी घेऊन सागर नामदेव शिंदे व तिघेजण थांबले होते. सागर शिंदे यांनी चालकांकडे तुझ्याकडे परवाना आहे का अशी विचारणा केली. यानंतर डंपरचे मालक संजय दुधाणे घटनास्थळी आले. त्यांनी तहसीलदार कुठे आहे असे विचारणा केली.
यावेळी चालकाने सागर शिंदे यांच्याकडे बोट करून हे तहसीलदार आहेत, असे सांगितले. सागर याने कोण आहे, ते दाखवतो असे म्हणत बाजूला घेऊन गेला. पन्नास हजार रुपये दे नाहीतर महिना एंट्री चालू कर. पैसे नाही दिलास तर तुझ्या गाड्या रस्त्यावर चालू देणार नाही अशी धमकी दिली. यावेळी दुधाणे यांने तुला काय करायचे ते कर असे सांगितले. यावेळी आम्ही तुझ्यावर जातिवाचक शिवीगाळ करण्याचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. याप्रकरणी सागर नामदेव शिंदे, सचिन शिंदे, सुनील पोळ, ऋषिकेश कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत संजय बसप्पा दुधाणे यांनी वडगाव पोलिसांत माहिती दिली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने करीत आहेत.
