चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. साखळी फेरीतील पराभवानंतर न्यूझीलंडने धडा घेतला आहे. तर भारताला विजयानंतर गाफील राहून चालणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपआपल्या परीने तयारी करत आहेत यात काही शंका नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीत 25 वर्षानंतर भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले आहेत. 25 वर्षापूर्वी 4 विकेट आणि 2 चेंडू राखून न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. आता त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारताकडे चालून आली आहे. अंतिम सामना जिंकून हिशेब बरोबर करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. या सामन्यात दोन्ही संघांच्या काही खेळाडूंकडे लक्ष असेल. कारण हे खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यांचा फॉर्म पाहता अंतिम फेरीत डाव पालटण्याची ताकद ठेवतात. चला जाणून घेऊयात या खेळाडूंबाबत
साखळी फेरीत न्यूझीलंडला विजय रथाला वरुण चक्रवर्तीने ब्रेक लावला होता. त्याने पाच विकेट घेत न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं होतं. वरुण चक्रवर्ती गोलंदाजीसह फलंदाजीतही सक्षम आहे. दुसरीकडे, विराट कोहलीला सूर गवसला आहे. त्यामुळे हायप्रेशर सामन्यात त्याची खेळी महत्त्वाची ठरणार आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिलला चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. तर हार्दिक पांड्या मधल्या फळीत फलंदाजी आणि गोलंदाजीत प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवून देऊ शकतो.
न्यूझीलंडचा मॅट हेन्री आणि फिरकीपटू मिचेल सँटनर भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात. या दोन्ही गोलंदाजांनी साखळी फेरीत चांगली गोलंदाजी केली आहे. तसेच गोल्डन बॉलच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना यांचा सामना करताना काळजी घ्यावी लागेल. दुसरीकडे, फलंदाजीत रचिन रविंद्रला रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ऋषभ पंत.
न्यूझीलंड संघ: विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी.