भारतीय क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभूत करीत चॅम्पियन चषक पटकाल्यानंतर इचलकरंजीत क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले. क्रिकेटप्रेमींनी जनता चौकात एकत्र येत मोठा आनंदोत्सव साजरा केला. एकमेकांना शुभेच्छा देत अनेकांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह रंगांची उधळण करीत जल्लोष साजरा केला. अवघी युवकांची मांदीयाळी मुख्य रस्त्यावर उतरली होती. दुबईत सुरू असलेल्या चॅम्पियन चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी भारत विरूध्द न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना झाला.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने युवा वर्गासह क्रिकेटप्रेमींनी सामना पाहण्याचा आनंद लुटला. यामुळे दुपारी अडीच वाजल्यानंतर शहरातील बहुतांश रस्ते सामसुम सदृश दिसत होते. अत्यंत अटीतटीचा आणि रंगतदार सामना झाल्याने क्रिकेटप्रेमींची उत्कंठा अखेर काही षटकापर्यंत शिगेला पोहोचली होती. विजयासाठी केवळ दोन धावांची गरज असताना जडेजाच्या बॅटमधून चौकार गेल्याने संघाने सामना जिंकला. टीम इंडियाच्या विजयामुळे शहरातील क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले. शहराच्या कानाकोपऱ्यातून दुचाकीवरून क्रिकेटप्रेमी जनता चौकात आले.
याठिकाणी मोठा जल्लोष साजरा केला. आनंदोत्सव साजरा करताना अनेक युवकांनी फटाके फोडले तर काहींनी नाचून आपला आनंद साजरा केला. या आनंदोत्सवाप्रसंगी पोलिसांनी जनता चौक तसेच परिसरात बंदोबस्त ठेवला होता. अतिउत्साही युवकांनी कर्णकर्कश आवाजात मुख्य रस्त्यावरून दुचाकी रॅली काढली.
